Friday, February 18, 2022

आसवांचे आटणे झाले कधी

 आसवांचे आटणे झाले कधी

दुःख मज ना वाटणे झाले कधी


कोरडे मानीत गेलो ग्रीष्म मी

हे नभाचे दाटणे झाले कधी


रोख ना, ना दागिने, ना बंगले

वेदनांचे साठणे झाले कधी


वाटले नेतील तारुन वादळी

त्या शिडांचे फाटणे झाले कधी


वैनतेया कृष्णही स्वामी जरी

पंख त्याचे छाटणे झाले कधी

कापडे बदलायची वेळ झाली

सूर्य बुडाला, दिवस मावळला

अंध:काराचे साम्राज्य पसरले

गात्रे थकली, जाणीवा निमाल्या

दृष्टसृष्टीचा विलय झाला


कापडे बदलायची वेळ झाली


उद्या नवा दिवस

नवा सूर्य, नवा प्रकाश

नव्या आकांक्षा, नवा अवकाश

नवे बंध, नवी नाती

का गतदिनाच्या अस्पष्ट स्मृती ?


उद्याचा दिवसही मावळेलच

शेवट नाहीच

पुनःपुन्हा हाच खेळ

पसारा मांडायचा, मोडायचा, पुन्हा मांडायचा

पुन्हा नवीन कापडे, नवीन रंगमंच, नवीन प्रवेश


जोपर्यंत हे बहुरुप्याचे सोंग आहे

तोवर नाटक वठवणे भागच आहे

रात्र आताच सुरू होतेय

थोडी विश्रांती घेऊ

पुन्हा दिवस उजाडेलच


कापडे बदलायची वेळ होईल

काही ओव्या (३)

 विश्वाच्या आरंभी | एकले ते शून्य |

केवल अनन्य | स्वयंपूर्ण ||


एकलेपणाचा | त्यास ये कंटाळा |

सोबत्यांचा मेळा | हवा वाटे ||


आदिकांक्षेतून | द्वैताचे जनन |

विश्व प्रसरण | पावू लागे ||


काळाचा प्रवाह | अनादि अनंत |

त्यास ना उसंत | कशाचीही ||


कार्य कारणाची | साखळी अनंत |

तोडी ज्ञानवंत | शून्यभोगी ||


द्वैताच्या कांक्षेचा | एकत्वी विलय |

त्यासी प्रत्यवाय | काही नाही ||


एकत्वाच्या भावी | स्थिरचित्त होणे |

शून्यत्वा नेणणे | सत्यमार्ग ||

काही ओव्या (२)

 दिसांचे सरणे | झाला उपचार |

जगाचा वेव्हार | हाचि असे ||


दिस आणि मास | सरोनिया जाती |

काळजाच्या क्षती | मिटताती ||


आपुल्या संसारी | जो तो रमे झणी |

न उरे स्मरणी | काहीसुद्धा ||


काळ कोणासाठी | थांबत तो नाही |

चालतचि राही | आप वेगे ||


मायाजगी उगा | गुंतून राहाणे |

ते एक करणे | मूर्खपण ||

 

पिंगट डोळ्यांची एक सुंदर मुलगी

 पिंगट डोळ्यांची एक सुंदर मुलगी

जेव्हा वर बघून आभाळाला म्हणते
लिही एक कविता माझ्यावर.

कसं नाही म्हणावं त्यानं

पिंगट डोळ्यांची तीच सुंदर मुलगी
जेव्हा दोन्ही हात पसरून विचारते सागराला
भरती म्हणजे काय रे

कसं आवरावं स्वतःला त्यानं

कालचक्र

 पिवळी झालेली पिकली पाने

गळून जातात निःसंगपणे

अन् झाडही तसेच उभे

साजरा करीत सोहळा खोडावर एक वलय वाढल्याचा


अन् पुन्हा अवतरतो वसंत

तीच जादू घेऊन हिरवाईची

पोपटी पालवी अंगभर लेऊन

झाडही डवरलेले नवीन उत्साहाने


काही घटकांपूर्वीच तर इथे शिशिर होता

दुःखी, उदास, मरगळलेला

झाड उभे निस्तब्ध, कवीही तसाच

अन् आता हा फुलोरा

झाडाच्या तनावर, कवीच्या मनावर


गातोय कवी आनंदाची गाणी

नाचतोय देहभान हरपून

          निर्विकार, निर्हेतुक झाडापुढे

आपलीही झालीय पानगळ

अन् तनूवर पडलाय काळाचा अजून एक विळखा

          याची जाणीवच नाहीये त्याला

पाऊस

 _ पाउस ओली माती

उलगडती नाजुक नाती

नाजुकशा कमलदलावर

जणु इवले इवले मोती


पाऊस मखमली हिरवळ

जणु चुडा ल्यायली धरती

अन् पानांपानांमधुनी

डोकावे श्रावण मूर्ती


_ पाउस सागर भरती

लहरी त्या नर्तन करिती

स्पर्शण्या पूर्ण चंद्राला

उसळती धुंद त्या वरती


_ पाउस भिजली सृष्टी

ती सतत अनाहत वृष्टी

नवनवोन्मेष अंकुरले

पाहता तृप्तली दृष्टी


---------------------------------------------


टीप : काही ठिकाणी पहिली मात्रा सोडली आहे. त्यामुळे तेथे _ चिन्ह वापरले आहे.