बुधवार, ४ डिसेंबर, २०२४

स्थलांतर

 पाळ अन् पाळ मोकळं करून

झाड हलवतात जेव्हा दुसऱ्याच जागी

खरंच रुजतं का ते तिथे?


का उभं राहतं ते 

मुळं पसरतात

पालवी पण फुटते नवी

पण माती परकीच राहते


कार्बन डायऑक्साइड घ्या 

प्राणवायू सोडा

प्रकाशसंश्लेषण वगैरे चालूच आहे 

फुलं फुलतायत 

फळं धरतायत 

जुने ओळखीचे पक्षी मात्र येत नाहीयेत


कुठेतरी सर्वात आतल्या वलयात

एक याद दडून राहिलीय

नंतर चढत गेलेल्या निबर वलयांमध्ये 

तिचं व्यक्त होणं राहून गेलंय


तेवढं एकदा मोकळं व्हायला हवं

नाहीतर उन्मळून पडेल झाड

साध्याशा सुद्धा वादळात 

मग कारणं शोधू आपण

पण पसरलेली मुळं पाहताना 

हे निसटेल नजरेतून 

की फारशी खोल ती गेलीच नव्हती कधी

गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

कांतारा

 एसी गाडीच्या काचा बंद करून

दुतर्फा दिव्यांनी लखलखलेल्या

शहरी रस्त्यांवरून जाताना

कडेला उभी दिसतात

झाडे


मुकी अबोल, काही न सांगणारी

मनातलं मनातच ठेवणारी

इथल्या माणसांसारखीच


पण रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या

प्रत्येक झाडाच्या आत

वसतंय एक अख्खं जंगल

बेबंद बहरलेलं आतल्या आत


कधी जवळ जाऊ नये

गाडीतून उतरून पाहू नये

सांभाळावं, कारण


जर झालाच स्पर्श

ह्या जंगलाचा

त्या जंगलाला

उधळून जाईल क्षणार्धात

हा पट बेगडी नागरतेचा

आणि उरेल फक्त आदिम सत्य


पप्पऽमगरिसा

अवचित यावे मेघ दाटुनी

 अवचित यावे मेघ दाटुनी

अवचित काळोखी पसरावी

तशी मनावर कातरवेळी

अनिष्ट चाहुल व्यापुन यावी


यावे संचित फेर धरोनी

आणि त्यासवे करडे आठव

अशुभाचे संकेत दिसावे

भविष्य व्हावे अवघे धूसर


तेव्हा असल्या कातरवेळी

यमनाचा गंधार घुमावा

तीव्र मध्यमाच्या तेजाने

वर्तमान क्षण उजळुन यावा


दूरस्थातिल चिंता साऱ्या

विरून जाव्या एका क्षणभर

पल्याड जाउन भविष्याचिया

उमजुन जावे

मी तो अक्षर

काय जीवीतास ह्या महत्त्व आहे

 कोण मी, काय माझे स्वत्व आहे

काय जीवीतास ह्या महत्त्व आहे


कोणती अदृश्य शक्ती चालवे मज

काय सर्वा अंतरीचे तत्त्व आहे


कोठुनी मी आणतो अवसान उसने

जाणतो जरि हे फुकाचे कवित्व आहे


काय असती प्रेरणा मम अंतरीच्या

दाटलेले घनतमी अंधत्व आहे


वाटते उधळून द्यावे सर्व संचित

पायी प्रपंच शृंखलांचे दास्यत्व आहे


केवढे गा लाभले मज पूर्वजांचे

केवढे अन् तोकडे कर्तृत्व आहे


जाणतो घेणे अता नाही भरारी

मालकीचे किंचित् असे अस्तित्व आहे