बुधवार, ४ जुलै, २०१८

रात वेडी

भंगलेल्या मैफिलीची रात वेडी
रिक्त चषकांची अता ही रात वेडी

झाकले जे दुःख मी काळ्या घनांनी
उघडणाऱ्या त्या विजांची रात वेडी

पाहिले मी चांदणे तू ल्यायलेले
आज का मग आवसेची रात वेडी ?

मजसवे दिवसा जरी धरला अबोला
अंतरीचे गूज सांगे रात वेडी

तोडले मी बंधनांचे पाश सारे
उरली अता ओल्या व्रणांची रात वेडी

दिवस माझे ज्यांपरी बर्बाद झाले
घेऊन आली तीच स्वप्ने रात वेडी

मोजतो उरले किती मी दिवस आता
राहिली मोजायची ती रात वेडी

शाल ओढुनि चांदण्याची रात आली अंगणी

शाल ओढुनि चांदण्याची रात आली अंगणी
मुग्ध त्या साऱ्या स्मृती उठल्या मनी झंकारुनी

स्मरल्या किती रात्री गुलाबी तुजसवे ज्या वेचल्या
अरुणोदयी पक्षीरवाने कितिक आणी विलगल्या
याद त्यांची जागली मग अंतरी आसावुनी

आणि स्मरती त्याहि ज्या विरहानलाने पेटल्या
खिन्न हृदयाने किती मी भग्न गजला रचियल्या
आज स्मरते सर्व ते पुरले कधी जे मन्मनी

जादू कशी ही होतसे या चांदराती ना कळे
अंतरीच्या गूढगर्भी दडवलेले उन्मळे
विसकटे आयुष्य सारे एक मोहाच्या क्षणी

तीच नक्षत्रे नभीची तेच वृक्ष नि वल्लरी
मी न उरलो तोचि पण सरत्या ऋतू संवत्सरी
उरले अता ते चित्र का अश्रूभऱ्या या लोचनी

शाल ओढुनि चांदण्याची रात आली अंगणी
मुग्ध त्या साऱ्या स्मृती उठल्या मनी झंकारुनी

मानसीचा चित्रकार तो


मानसीचा चित्रकार तो मानसीचे चित्र काढतो

मानसीने त्याला दिधला जो मागितला तो मोबदला
चित्र स्वतःचे काढविण्याला
दो पैशाला कला आपुली, कला आपुली विकतो

कृष्ण वर्ण अन् लठ्ठ असे ती, नाकही बसके दातही पुढती
अशी मानसी चंद्रमुखी ती
लठ्ठ पगाराच्या आशेने आत्मघात पत्करतो

याद करुनी आद्य गुरुला, काण्या राजाच्या चित्राला
रंग जमवुनी आणि कुंचला
पैशासाठी चिता कलेची, चिता कलेची रचतो

चित्र काढतो ...............

मंगळवार, ३ जुलै, २०१८

पैलतिरीच्या नीलदिव्यांनो


पैलतिरीच्या नीलदिव्यांनो
  कुणास तुमच्या व्यथा सांगता
किंवा का मग कातरवेळी
  अंतरगर्भी दडवू बघता


पैलतिरीच्या नीलदिव्यांनो
  जलहलती प्रतिबिंबे तुमची
पृष्ठावरची खळबळ का हो
  कथी स्पंदने तुमच्या मनिची

पैलतिरीच्या नीलदिव्यांनो
  कशास हो एकाकी जळता
वाट पाहता कोणाची अन्
  उत्तररात्री झुरून विझता

पैलतिरीच्या नीलदिव्यांनो
  प्रकाश तुमचा कोणासाठी
घरटी परतू बघणाऱ्या का
  सांजभारल्या पक्षिणिसाठी

पैलतिरीच्या नीलदिव्यांनो
  पैलतिरावर दुनिया तुमची
चुकूनही कधि ऐलतिराच्या
  मोजु नका प्रश्नांची उंची

पैलतिरीच्या नीलदिव्यांनो
  एकदाच तुम्हि मजला सांगा
दिसतो का हो माझा साजण
  पैलतिरीच्या नीलमरंगा