बुधवार, ४ जुलै, २०१८

रात वेडी

भंगलेल्या मैफिलीची रात वेडी
रिक्त चषकांची अता ही रात वेडी

झाकले जे दुःख मी काळ्या घनांनी
उघडणाऱ्या त्या विजांची रात वेडी

पाहिले मी चांदणे तू ल्यायलेले
आज का मग आवसेची रात वेडी ?

मजसवे दिवसा जरी धरला अबोला
अंतरीचे गूज सांगे रात वेडी

तोडले मी बंधनांचे पाश सारे
उरली अता ओल्या व्रणांची रात वेडी

दिवस माझे ज्यांपरी बर्बाद झाले
घेऊन आली तीच स्वप्ने रात वेडी

मोजतो उरले किती मी दिवस आता
राहिली मोजायची ती रात वेडी

शाल ओढुनि चांदण्याची रात आली अंगणी

शाल ओढुनि चांदण्याची रात आली अंगणी
मुग्ध त्या साऱ्या स्मृती उठल्या मनी झंकारुनी

स्मरल्या किती रात्री गुलाबी तुजसवे ज्या वेचल्या
अरुणोदयी पक्षीरवाने कितिक आणी विलगल्या
याद त्यांची जागली मग अंतरी आसावुनी

आणि स्मरती त्याहि ज्या विरहानलाने पेटल्या
खिन्न हृदयाने किती मी भग्न गजला रचियल्या
आज स्मरते सर्व ते पुरले कधी जे मन्मनी

जादू कशी ही होतसे या चांदराती ना कळे
अंतरीच्या गूढगर्भी दडवलेले उन्मळे
विसकटे आयुष्य सारे एक मोहाच्या क्षणी

तीच नक्षत्रे नभीची तेच वृक्ष नि वल्लरी
मी न उरलो तोचि पण सरत्या ऋतू संवत्सरी
उरले अता ते चित्र का अश्रूभऱ्या या लोचनी

शाल ओढुनि चांदण्याची रात आली अंगणी
मुग्ध त्या साऱ्या स्मृती उठल्या मनी झंकारुनी

मानसीचा चित्रकार तो


मानसीचा चित्रकार तो मानसीचे चित्र काढतो

मानसीने त्याला दिधला जो मागितला तो मोबदला
चित्र स्वतःचे काढविण्याला
दो पैशाला कला आपुली, कला आपुली विकतो

कृष्ण वर्ण अन् लठ्ठ असे ती, नाकही बसके दातही पुढती
अशी मानसी चंद्रमुखी ती
लठ्ठ पगाराच्या आशेने आत्मघात पत्करतो

याद करुनी आद्य गुरुला, काण्या राजाच्या चित्राला
रंग जमवुनी आणि कुंचला
पैशासाठी चिता कलेची, चिता कलेची रचतो

चित्र काढतो ...............

मंगळवार, ३ जुलै, २०१८

पैलतिरीच्या नीलदिव्यांनो


पैलतिरीच्या नीलदिव्यांनो
  कुणास तुमच्या व्यथा सांगता
किंवा का मग कातरवेळी
  अंतरगर्भी दडवू बघता


पैलतिरीच्या नीलदिव्यांनो
  जलहलती प्रतिबिंबे तुमची
पृष्ठावरची खळबळ का हो
  कथी स्पंदने तुमच्या मनिची

पैलतिरीच्या नीलदिव्यांनो
  कशास हो एकाकी जळता
वाट पाहता कोणाची अन्
  उत्तररात्री झुरून विझता

पैलतिरीच्या नीलदिव्यांनो
  प्रकाश तुमचा कोणासाठी
घरटी परतू बघणाऱ्या का
  सांजभारल्या पक्षिणिसाठी

पैलतिरीच्या नीलदिव्यांनो
  पैलतिरावर दुनिया तुमची
चुकूनही कधि ऐलतिराच्या
  मोजु नका प्रश्नांची उंची

पैलतिरीच्या नीलदिव्यांनो
  एकदाच तुम्हि मजला सांगा
दिसतो का हो माझा साजण
  पैलतिरीच्या नीलमरंगा

शनिवार, ३० जून, २०१८

प्रतीक्षा


बरेच दिवस झाले
एकतर्फीच चालू आहे आपला संवाद
मी एकटाच बोलतोय
तुझ्यापर्यंत पोचतंय, नाही पोचतंय, कुणास ठाऊक.
पोचत असेलच म्हणा.
तुझे मूक प्रतिसाद जाणवलेत मला कितीतरी वेळा.
आणि जाणीव करून दिलीय
की आपण देह दोन असलो तरी अभिन्नत्व नाही आपल्यात
माझा अंश आहेच तुझ्यात
आणि तुझे अस्तित्व कारण बनावे माझ्या अस्तित्वाचे
इतके विस्तारलेय.


पण आता पुरे ही प्रतीक्षा.
प्रत्यक्ष भेट आता व्हायलाच हवी
धीर धरलाय मी पुरेसा
पुरेसा वेळ दिलाय तुलाही


आणि कोष सोडायलाच हवा कधीतरी ...

सोमवार, ८ जुलै, २०१३

कविता : मुक्तक

वाहता वारा अचानक पडला
शांत स्तब्ध झाल्या लाटा
भर मध्यावर महासागराच्या
अन् पसरली एक निरव शांतता
नास्तित्वाच्या पोकळीत

एक एकेरी गलबत
स्थिरावलं त्या निस्तब्धावर
त्याच्या मागे त्याने कापलेलं पाणी
जुळलं पुन्हा एकदा
आणि एकच एक चादर द्यावी ताणून
तसा महासागराचा पृष्ठभाग
पार क्षितिजापर्यंत
अनादि अनंत

मिटले सर्व संदर्भ दिशांचे
अन् प्रयोजनांचे
भूतकाळातील प्रवासांचे
सोडलेल्या तीरांचे
समुद्राच्या प्रवाहीत्वाचे
उरला फक्त आधार
अवकाशातील ग्रहताऱ्यांचा
ज्यांचा आपल्यावरील प्रभाव
कायमच दिला होता झुगारून
पाय जमिनीवर घट्ट असताना

आता फक्त एक एकेरी गलबत
नास्तित्वाच्या पोकळीत
आता प्रवास फक्त
वल्ही मारून
आपल्या मनगटाच्या जोरावर

शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१३

माझ्या जिण्यास तेव्हा हसलेच सर्व होते



मुडदे मुघल् तळ्याशी पुरलेच सर्व होते
घोडे चुकार तेथे अडलेच सर्व होते


का ऐकवीत होतो मी आर्त प्रेमकविता
पर्वा तिला कशाची ? (ठरलेच सर्व होते)


बांधू पहात होतो प्रारब्ध मी तिच्याशी
वेडे जुनाट धागे विरलेच सर्व होते


ढाळू नका कुणीही अश्रू चितेसमोरी
माझ्या जिण्यास तेव्हा हसलेच सर्व होते


जेथे विसावलो मी त्यांनीच घात केला
वासे उभ्या घराचे फिरलेच सर्व होते


धर्मास कोण जागे ? कोणास न्याय पटतो ?
बाहुबली, ठरवण्या, भिडलेच सर्व होते


मी रात्रिचा प्रवासी, माझ्या अनन्त वाटा
दिवसातले ठिकाणे सरलेच सर्व होते