शुक्रवार, १५ फेब्रुवारी, २०१३

माझ्या जिण्यास तेव्हा हसलेच सर्व होते



मुडदे मुघल् तळ्याशी पुरलेच सर्व होते
घोडे चुकार तेथे अडलेच सर्व होते


का ऐकवीत होतो मी आर्त प्रेमकविता
पर्वा तिला कशाची ? (ठरलेच सर्व होते)


बांधू पहात होतो प्रारब्ध मी तिच्याशी
वेडे जुनाट धागे विरलेच सर्व होते


ढाळू नका कुणीही अश्रू चितेसमोरी
माझ्या जिण्यास तेव्हा हसलेच सर्व होते


जेथे विसावलो मी त्यांनीच घात केला
वासे उभ्या घराचे फिरलेच सर्व होते


धर्मास कोण जागे ? कोणास न्याय पटतो ?
बाहुबली, ठरवण्या, भिडलेच सर्व होते


मी रात्रिचा प्रवासी, माझ्या अनन्त वाटा
दिवसातले ठिकाणे सरलेच सर्व होते

सोमवार, २६ मार्च, २०१२

अनिर्णयाचा द्वारपाल

अनिर्णयाचा द्वारपाल काल मला भेटला होता
अनिर्णयाचं चक्र फिरत होतं त्याच्या डोक्यावर

म्हणाला,
वाटलंच मला तू येशील इथवर
तुझ्यासारख्या माणसाचं प्राक्तन आणतंच त्याला
असो
आता आलाच आहेस
तर बस घटकाभर
इथून पुढे जाण्याआधी दोन क्षण विश्रांती घेतलेली बरी
बरंच ऐकलं असशील,
पलीकडच्या जगाबद्दल
अलीकडच्या जगातील माणसांकडून
जी कधी या दारापर्यंतसुद्धा पोचली नाहीत

अरे, असा बावचळू नकोस
सगळंच काही खोटं नसेल ते म्हणाले त्यातलं
आणि काही जण गेलेत ना पलीकडे
त्यांना सोडतेवेळीस
पाहिलंय मी डोकावून
किलकिल्या दारातनं
डावीकडचं आणि उजवीकडचंसुद्धा
आणि एक सांगू का ?
नाही, तू विचारलं नाहीयेस
पण सांगतो
अलीकडच्या जगातील शब्दांच्या खेळावर
विश्वास ठेवू नकोस हं
त्याहून फार पलीकडे आहे पलीकडचं जग

पण काय रे ?
ठरलंय ना तुझं ?
डावं की उजवं ते ?
मी हसलो फक्त क्षीणपणे
म्हणजे तुझंही त्याच्याचसारखं की काय?
हत्ती मेला का माणूस या प्रश्नापायी
आयुष्य होरपळून घेणाऱ्या त्या राजासारखं

द्वारपाला, तू पाहिली आहेस ना पण दोन्ही जगं
तूच का नाही दाखवत योग्य दार मला ?
थकलोय रे मी इथवर चालून

वा वा ! मीच सांगू म्हणतोस हे रहस्य ?
अनिर्णयाच्या द्वारपालास विचारतोस तुझ्या आयुष्याच्या निर्णयाबद्दल ?

एकदम गगनभेदी हसला तो
अन् क्षणार्धात
अग्निच्या ज्वाळांनी भस्म होऊन गेलं त्याचं शरीर
एक अनामिक कळ उठली
माझ्या मस्तकातून
अनिर्णयाचं दातेरी चक्र स्थिरावलं होतं
माझ्या मस्तकावर

मीच झालो होतो
अनिर्णयाचा द्वारपाल

रविवार, २५ मार्च, २००७

अशांतता

आज काहीतरी लिहावे असे वाटत होते. काय लिहावे ? माहीत नाही. खूप काहीतरी विचित्र वाटतंय. मन भरून आलंय. कशाने ते कळत नाही. खूप काम समोर दिसतयं. पण हातून काहीच होत नाही.

मन कशानेतरी अशांत आहे. कसली तरी हूरहूर लागून रहिली आहे. काहीतरी घडणार आहे हे मला कळतयं. काहीतरी विचित्र. माझी तयारी आहे का ? कळत नाही. करायला हवी हे ही कळतयं. पण नेमके काय ते कसं कळावं ? काहीतरी गडबड आहे. जेव्हा एकटा असतो तेव्हा विचारांनी डोकं पार उठतं. विचार, विचार, विचार. मन सैरभैर होतं.

सर्व दैनंदिन व्यवहार व्यवस्थित सुरु आहेत. सर्व कामे नीटपणे करत आहे. पण कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं. इतरांना कदाचित माझी मनोवस्था कळणार नाही. मला मात्र आत काहीतरी तुटल्यासारखं एकदम जाणवतं. आणि जगाशी असलेला संपर्क क्षणभर तुटून मी स्वतःलाच हरवून बसतो.

कदाचित मला लवकरच या सर्वाचं कारण समजेल. मी वाट पहातोयं. ...

गुरुवार, २२ मार्च, २००७

नवीन वर्षाच्या शुभेच्छा !!!

नवीन वर्ष सुरू होऊन २-३ दिवस झाले. अजून संकल्प केलेले नाहीत. पण मनात काही गोष्टींचा विचार केला आहे. इथे आत्ता काही लिहिणार नाही. पण मनाशी काही ठरवलेले आहे. पूर्ण झाले तर लिहू.

एक निश्चित, ते म्हणजे नियमित लेखन. मनाला भावलेल्या कोणत्याही विषयावर. आणि कसलीही चिंता न करता. बिंधास्तपणे लिहित जाणार. पाहू हे वर्ष मला (आणि माझ्या वाचकांना ) कसे जाते ते.

मंगळवार, १३ मार्च, २००७

namaskaar

नमस्कार,

बरेच दिवस मराठी भाषेत लिहीन असा विचार करत होतो परंतु आज वेळ झाला.....

असो , आज इतके पुरे या पुढे लिहित जाईन